महाराष्ट्रात नवीन २२ जिल्ह्यांची निर्मिती होणार
महाराष्ट्रात सध्या ३६ जिल्हे असून, राज्यात २२ नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अनेक वर्षांपासून राज्यातील लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा पुनर्रचनेची मागणी केली जात आहे. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे नागरिकांच्या समस्या सुटतील आणि प्रशासन अधिक प्रभावीपणे कार्य करू शकेल, अशी अपेक्षा आहे.
👇👇👇
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली, तेव्हा राज्यात २६ जिल्हे होते. पुढे, लोकसंख्येतील वाढ आणि प्रशासकीय सोयीसाठी १९८१ ते १९९८ या काळात टप्प्याटप्प्याने १० नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. सध्या महाराष्ट्रात ३६ जिल्हे आणि २८८ तालुके आहेत. मात्र, काही जिल्ह्यांचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे असल्याने नागरिकांना मुख्यालय गाठण्यासाठी मोठा प्रवास करावा लागतो.
नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी अनेक भागांमधून मागण्या येत होत्या. या मागण्यांवर विचार करून, ठराविक जिल्ह्यांचे विभाजन करून २२ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. विशेषतः, कोकण विभागात रायगड जिल्ह्याचे विभाजन करून महाड, ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून मिरा भाईंदर आणि कल्याण, तर पालघर जिल्ह्यातून जव्हार या जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे.
महाराष्ट्रातील प्रस्तावित नवीन जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.
सध्याचा जिल्हा | प्रस्तावित नवीन जिल्हा |
---|
नाशिक | मालेगाव, कळवण |
पालघर | जव्हार |
ठाणे | मीरा-भाईंदर, कल्याण |
अहमदनगर | शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर |
पुणे | शिवनेरी |
रायगड | महाड |
सातारा | माणदेश |
रत्नागिरी | मानगड |
बीड | अंबेजोगाई |
लातूर | उदगीर |
नांदेड | किनवट |
जळगाव | भुसावळ |
बुलडाणा | खामगाव |
अमरावती | अचलपूर |
यवतमाळ | पुसद |
भंडारा | साकोली |
चंद्रपूर | चिमूर |
गडचिरोली | अहेरी |
नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रशासकीय काम अधिक सुलभ होईल. ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी होणारा वेळ आणि खर्च कमी होईल. शिवाय, स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणा बळकट होईल.
राज्य सरकारकडून जिल्हा पुनर्रचनेच्या आराखड्याची प्राथमिक तयारी सुरू आहे. यामध्ये स्थानिक लोकांच्या मागण्या, भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या आणि प्रशासनाची गरज विचारात घेतली जाईल.
राजस्थानमध्ये नुकतीच १९ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील ही प्रक्रिया देखील वेगाने पूर्ण होण्याची शक्यता आहे. राज्यातील नागरिकांना या निर्णयाची प्रतीक्षा आहे, ज्यामुळे प्रशासनिक सेवा आणि विकासाचे मार्ग सुकर होतील.