Maharashtra Cabinet Expansion Minister List: राज्यातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर दृष्टीपथात आला आहे.मुंबई किंवा नागपूर येथे महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडणार आहे.त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपदाची संधी मिळणार, याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेला एकूण 9 मंत्रीपदं आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळणार आहेत. ही यादी जवळपास निश्चित मानली जात आहे. यामध्ये नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी योग्य संतुलन राखले आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेच्या मंत्रिपदाच्या संभाव्य यादीमध्ये गेल्या अडीच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचाही समावेश आहे.
हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळात शपथ घेतील, असे सांगितले जात होते.
मात्र, आता पुन्हा सत्ता आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी न विसरता गोगावले आणि शिरसाट यांना पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली आहे.
याशिवाय, ठाण्यातील शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे या नव्या चेहऱ्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
हे सगळेजण उद्या राजभवनात होणाऱ्या सोहळ्यात मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या सगळ्यांच्या वाट्याला कोणती खाती येणार, हे बघावे लागेल.
*दरम्यान, माजी मंत्री तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देण्यास शिवसेनेतील आमदारांनी विरोध केला होता. या नेत्यांकडे गेल्यावर कामच होत नाहीत. हे नेते केवळ आश्वासनं देतात.
प्रत्यक्षात काम होत नसल्याचा आरोप आमदार खासगीत करतात.पण, दादा भुसे, गुलाबराव पाटील या दोन नेत्यांची नावे पुन्हा मंत्रिमंडळाच्या संभाव्या यादीत आहेत.त्यामुळे तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.*
एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभुराज देसाई, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, भरत गोगावले*
शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री
योगेश कदम, विजय शिवतारे, राजेंद्र पाटील यड्रावरकर अथवा प्रकाश आबिटकर